(दापोली / प्रतिनिधी)
दापोली एसटी स्थानकात सोमवारी (दि. १० जून) दुपारी एका महिलेस अपघात होऊन गंभीर दुखापत झाली. बसस्थानकात रिव्हर्स घेत असलेल्या एमएच १४ बीटी २३०० क्रमांकाच्या एसटी गाडीच्या धडकेत खेर्डी गावातील महिला जखमी झाली असून, तिच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला बसस्थानकात कोणती गाडी लागली आहे, हे विचारण्यासाठी जवळ गेली असताना चालकाने गाडी रिव्हर्स घेतली. त्याचवेळी गाडीच्या पुढील भागाचा धक्का बसून ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तातडीने तिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातस्थळी पंचनामा सुरू असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.