(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत धडक कारवाई करत शहरातील आठवडा बाजार परिसरात ब्राऊन हेरॉईन विक्री व सेवन करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी नियमित पेट्रोलिंगदरम्यान करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयास्पद हालचाली आढळून आल्याने केलेल्या तपासात संबंधित तिघे ब्राऊन हेरॉईनची विक्री व सेवन करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून एकूण ४७ ब्राऊन हेरॉईनचे पुडके जप्त करण्यात आले असून, या गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९३ हजार ८०० रुपये इतकी आहे. ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व त्यांच्या पथकाने केली.

