(खेड)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर कशेडी बोगदा ते चिपळूण या दरम्यान महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी राहत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच भरणे नाका परिसरातील पुलाखाली अवैधरित्या पार्किंग करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी खेड पोलिस निरीक्षक विवेक आयरे यांची भेट घेत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
भाजपकडून यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून महामार्गावरील अवजड वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी महामार्गालगत उभी असलेली वाहने अपघातास कारणीभूत ठरत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
याशिवाय भरणे नाका येथील पुलाखाली करण्यात आलेल्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत असून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजप खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजप अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोल, भाजप युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विजय गुप्ता आणि ओवैस चौगुले उपस्थित होते.

