(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोयना धरणातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटल्याने अनेक वर्षांपासून जलाशयाखाली दडलेले इतिहासाचे अवशेष पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील निसर्ग व पर्यावरण अभ्यासक समीर कोवळे, जल अभ्यासक शाहनवाज शाह आणि कृषी अभ्यासक पृथ्वीराज पवार यांनी कोयना खोऱ्यात बहुउद्देशीय निसर्ग अभ्यास मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.
अर्थ फाऊंडेशन आणि ग्लोबल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोहिमेत कोयना धरण परिसरातील बदलती पर्यावरणीय परिस्थिती, जलसाठ्याची स्थिती, जंगल परिसर, बुडित गावे आणि स्थानिक लोकजीवनाचा सखोल अभ्यास करण्यात आला.
मोहिमेदरम्यान अभ्यासकांनी सह्याद्री पर्वतरांगांतील कोयना खोरे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगतचा बफर झोन तसेच दुर्गम जंगल परिसरात ट्रेकिंग करून प्रत्यक्ष पाहणी केली. बाजे-वाझेगाव, वनकुसवडे, पळासरी यांसारख्या विस्थापित गावांचा परिसर, शिवसागर जलाशय, शेतशिवार आणि स्थानिक वस्त्यांचे निरीक्षण करण्यात आले.
स्थानिक ग्रामस्थ हणमंत सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००० पूर्वी झालेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे मृदा धूप वाढली असून मोठ्या प्रमाणात गाळ जलाशयात साचला आहे. त्यामुळे शिवसागर जलाशयाची पाणी साठवण क्षमता सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी घटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच जंगल परिसरात ॲकेशिया आणि निलगिरीसारख्या विदेशी वृक्षांचे प्रमाण वाढल्याचेही निदर्शनास आले.
अभ्यासकांनी धरण परिसरात सिंचन सुविधांचा अभाव, शेतीवरील परिणाम तसेच स्थानिकांचे शेती, पशुपालन आणि शेळीपालनावर असलेले अवलंबित्व यांचाही अभ्यास केला. वाढत्या उष्णतेचा आणि बदलत्या हवामानाचा ग्रामीण जीवनावर होत असलेला परिणामही त्यांनी नोंदवला.
धरणातील पाणी घटल्यामुळे बुडित क्षेत्रातील अनेक ऐतिहासिक अवशेष पुन्हा दिसू लागले आहेत. बाजे-वाझेगाव येथील ग्रामदैवत श्रीदेवी बाजूबाई मंदिर, श्री लक्ष्मी देवी मंदिर, राणीबाईचा वाडा तसेच जुन्या घरांचे अवशेष आणि पुरातन वस्तूंची पाहणी करण्यात आली. पळासरी गावातील जुन्या लोकवस्तीचे अवशेष आणि मारुती मंदिराचाही अभ्यास मोहिमेदरम्यान करण्यात आला.
परतीच्या प्रवासात वनकुसवडे येथील उंबरघळ परिसरातील नैसर्गिक प्राचीन गुहेचीही पाहणी करण्यात आली. या अभ्यास मोहिमेसाठी स्थानिक मार्गदर्शक निलेश फुटाणे आणि हणमंत सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले.
कोयना खोऱ्यातील पर्यावरणीय बदल, जलसंपदा, इतिहास आणि स्थानिक जीवनशैली यांचा एकत्रित अभ्यास करणारी ही मोहीम संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

