(संगमेश्वर / प्रतिनिधी)
समाजातील सज्जनशक्ती एकत्र आली तर कोणतेही कठीण कार्य सहज शक्य होते, याचा प्रत्यय सध्या देवरुखकरांना येत आहे. देवरुख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील प्रभाकर कदम यांचे कुटुंब अत्यंत दयनीय अवस्थेतील घरात राहत असल्याची बाब देवरुखचे नगरसेवक रुपेश भागवत यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी या कुटुंबाला हक्काचे सुरक्षित घर मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
प्रभाकर कदम यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी नगरसेवक रुपेश भागवत यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र काही कायदेशीर अडचणींमुळे शासकीय योजनेचा लाभ मिळणे शक्य होत नव्हते. तरीही या कुटुंबाला मदतीपासून वंचित ठेवायचे नाही, या भूमिकेतून रुपेश भागवत यांनी आपल्या ज्येष्ठ बंधू तसेच देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सदानंद भागवत यांच्यासमोर हा विषय मांडला.
यानंतर भागवत बंधूंनी स्वतः पुढाकार घेत समाजातील दानशूर आणि सज्जन व्यक्तींना मदतीचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला देवरुखमधील नागरिक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गुरुवार, १४ मे रोजी सदानंद भागवत, रुपेश भागवत तसेच मदतीसाठी पुढे आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत नवीन घराच्या बांधकामाचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला. समाजातील विविध स्तरांतून मिळालेल्या सहकार्यामुळे प्रभाकर कदम कुटुंबाचे सुरक्षित आणि सन्मानाचे घर मिळवण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे.
एखाद्या गरजू कुटुंबासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी एकत्र येत संपूर्ण घर उभारण्याचा घेतलेला हा उपक्रम देवरुखमध्ये दुर्मीळ मानला जात असून या सामाजिक कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

