(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणच्या हापूस आंब्याला यंदा उत्पादन घट, वाढते तापमान आणि निर्यात ठप्प अशा तिहेरी संकटांचा सामना करावा लागत असून, बाजारातील घसरत्या दरामुळे बागायतदार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. सुरुवातीला चांगला दर मिळाल्यानंतर आता आंब्याचे भाव अक्षरशः कोसळू लागल्याने “आंबा विकायचा तरी कुठे?” असा संतप्त सवाल बागायतदारांमधून उपस्थित होत आहे.
गेल्या आठवड्याभरापासून कोकणातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे झाडांवरील आंबा झपाट्याने पिकू लागल्याने बाजारात अचानक मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. त्यातच आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, परदेशात जाणारा हापूस आता देशांतर्गत बाजारपेठेतच विक्रीसाठी येत आहे. परिणामी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध बाजारपेठांमध्ये कोकण, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या आंब्यांचा अक्षरशः पूर आला आहे.
यंदा सुरुवातीला हापूसला समाधानकारक दर मिळत होता. मात्र बाजारातील वाढती आवक आणि निर्यात ठप्प झाल्याने दर घसरू लागले. सध्या चार ते पाच डझनाच्या पेटीसाठी अवघे ७०० ते १२०० रुपये मिळत असून, प्रत्यक्षात बहुतांश बागायतदारांच्या पदरी ७०० ते ८०० रुपयांचाच दर पडत असल्याची स्थिती आहे. खत व्यवस्थापन, फवारणी, मजुरी, वाहतूक आणि पॅकिंग यांचा वाढता खर्च पाहता हा दर परवडणारा नसल्याचे बागायतदार सांगत आहेत. विशेष म्हणजे, अनेक व्यापाऱ्यांनी आता बागायतदारांना थेट फोन करून “दर परवडत असेल तरच आंबा पाठवा, अन्यथा पाठवू नका,” असा सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उत्पादन हातात असूनही विक्रीची चिंता अधिक गडद झाली आहे. नाशवंत फळ असल्याने आंबा जास्त काळ साठवून ठेवणे शक्य नसल्याने अनेक बागायतदार मिळेल त्या दरात विक्री करण्यास भाग पडत आहेत.
यावर्षी सुरुवातीपासूनच आंबा हंगाम संकटांनी वेढलेला होता. चांगला मोहोर आल्यानंतर अवकाळी थंडीने त्याचा मोठा फटका बसला. मोहोर करपल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाने शासनाला दिलेल्या अहवालानुसार यंदाचे उत्पादन केवळ १५ ते २० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याचे स्पष्ट झाले होते. कमी उत्पादनामुळे चांगल्या दराची अपेक्षा होती; मात्र बाजारपेठेतील परिस्थितीने बागायतदारांच्या आशांवर पाणी फेरले.
दर वाढवायला सांगितले अन् कॅनिंग कंपन्यांनी खरेदीलाच कुलूप मारले!
दरम्यान, कॅनिंग उद्योगाकडूनही बागायतदारांची निराशाच होत आहे. कमी दराच्या काळात कॅनिंगसाठीचा दर ५० रुपयांवरून थेट ३० रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला होता. याबाबत बागायतदारांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर सामंत यांनी कॅनिंग कंपन्यांना ५० रुपये दर देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करत अनेक कंपन्यांनी खरेदीच थांबवल्याचा आरोप बागायतदारांकडून केला जात आहे. त्यामुळे “आगीतून फुफाट्यात” अशी अवस्था झाल्याची भावना बागायतदारांमध्ये व्यक्त होत आहे. एकीकडे कोकणचा हापूस जागतिक बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करत असताना, दुसरीकडे स्थानिक बागायतदारांना उत्पादन खर्चही निघत नसल्याची शोकांतिका यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा समोर आली आहे.

