(संगमेश्वर / एजाज पटेल)
चैतन्य आर्ट, चिपळूण या नामांकित संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त तसेच पवित्र आषाढी वारी कार्यक्रमाचे औचित्य साधून संगमेश्वर येथील ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना नुकताच मानाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ, उल्लेखनीय आणि समर्पित योगदानाबद्दल त्यांना हा बहुमान देण्यात आला. या गौरवाचे औचित्य साधून संगम ज्येष्ठ नागरिक संघ, संगमेश्वर यांच्या वतीने विधाता कलेक्शनच्या सभागृहात सत्यवान विचारे यांच्या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवर आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यवान विचारे यांच्या प्रदीर्घ पत्रकारिता प्रवासासह त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे मनःपूर्वक कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये यांनी विचारे यांच्या पत्रकारितेचे आणि व्यक्तिमत्त्वाचे अर्थपूर्ण शब्दांत वर्णन केले. सत्यवान यांच्या नावातच ‘सत्य’ समाविष्ट असल्याने ते आपल्या नावाला पूर्णपणे जागले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
निर्भीड, अभय आणि निस्वार्थी वृत्तीने बातम्या मांडून समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे तसेच शोषितांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून देण्याचे मोठे कार्य विचारे यांनी केले आहे, असे ते म्हणाले. आपल्याच संघातील एका निकटच्या आणि ज्येष्ठ सहकाऱ्याचा अशा सर्वोच्च जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होणे ही संपूर्ण संगम ज्येष्ठ नागरिक संघासाठी गौरवाची, अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष उदय संसारे यांनी मनोगत व्यक्त करताना सत्यवान विचारे यांच्या पत्रकारितेतील तसेच सामाजिक योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. सत्यवान विचारे हे केवळ नामवंत पत्रकार नसून संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे सक्रिय आणि जबाबदार सदस्य आहेत, ही संपूर्ण संघासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. निष्पक्ष, अभ्यासू आणि ज्येष्ठ पत्रकाराचे सहकार्य संघाला सातत्याने मिळत असल्याचे नमूद करत त्यांनी विचारे यांच्यासारखे ऋषितुल्य आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व संघाशी जोडलेले असल्यामुळे संघाची प्रतिष्ठा वाढली आहे, असे सांगितले. संघाच्या सामाजिक उपक्रमांना त्यांच्यामुळे वेगळे बळ, नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली असून त्यांची बातमीदारी आणि सामाजिक विषयांवरील पकड सर्व सदस्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली आहे, असेही संसारे यांनी सांगितले.
या प्रसंगी निवृत्त शिक्षक व संघाचे ज्येष्ठ सदस्य श्रीकृष्ण बेंडके यांनीही विचारे यांच्या बातमीदारीच्या कौशल्याचे आणि सामाजिक योगदानाचे कौतुक केले. सत्यवान विचारे यांची पत्रकारिता नेहमीच अभ्यासू, वस्तुनिष्ठ आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करणारी ठरली आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही शिक्षक म्हणून वर्गात समाज घडवण्याचे काम केले, तर विचारे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील त्रुटींवर अचूक बोट ठेवून जनजागृती केली आणि निस्पृहपणे सत्य मांडले, असे सांगत हा सन्मान म्हणजे प्रामाणिक व मूलगामी पत्रकारितेची पोचपावती असल्याचे बेंडके यांनी स्पष्ट केले.
सत्कार आणि शुभेच्छांना उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे भावुक झाले. ते म्हणाले, “मला आतापर्यंत तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. तरीसुद्धा आज संगम ज्येष्ठ नागरिक संघाने केलेला हा सत्कार म्हणजे माझ्या स्वतःच्या परिवाराने केलेला सत्कार आहे. यामुळे मला विशेष आणि मनापासून आनंद झाला आहे.”
आपल्या सत्कारामागील कौटुंबिक योगदानाचा उल्लेख करताना विचारे म्हणाले, “चिपळूण येथे मला मिळालेला ‘जीवन गौरव पुरस्कार’ हा माझा नसून संगम ज्येष्ठ नागरिक संघाचा आहे. संघाने दिलेल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच मला पत्रकारितेचे काम करण्याची प्रेरणा मिळाली. या कामाचे सर्व श्रेय माझ्या कुटुंबाला, विशेषतः माझ्या पत्नीला जाते. पत्रकारिता करताना वेळेचे आणि काळाचे कोणतेही बंधन नसते. कोणत्याही क्षणी घराबाहेर पडावे लागते. अशा कठीण आणि धावपळीच्या परिस्थितीत कुटुंबाची भक्कम साथ मिळाली नाही, तर हे काम अविरतपणे करणे शक्य होत नाही.”
संघाने आणि संगमेश्वरच्या जनतेने दिलेल्या अथांग प्रेमामुळेच पत्रकारितेत अविरत काम करण्याचे बळ मिळाले, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार म्हणून प्रत्यक्ष घटनांमागील सत्य आणि वास्तवाचे भान जपत ते समाजासमोर आणण्याचा आपण नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी भविष्यातही कोणताही संघर्ष झेलण्याची आपली पूर्ण तयारी आहे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या गौरव सोहळ्याला संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये, उपाध्यक्ष उदय संसारे, सेवानिवृत्त शिक्षक श्रीकृष्ण बेंडके, बी. डी. पाटील, अविनाश चोचे, विनायक पाथरे, विनय मुरकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी सामाजिक, सांस्कृतिक आणि बातमीदारीच्या यशस्वी प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

