(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील नाणीज परिसरात ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीच्या अर्धवट आणि संथ गतीने सुरू असलेल्या कामांचा फटका पुन्हा एकदा ग्रामस्थांना बसला आहे. शनिवारी (९ मे) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे महामार्गालगतच्या अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये तसेच अंगणात पावसाचे पाणी घुसून नागरिकांचे नुकसान झाले. मान्सून तोंडावर आलेला असतानाही आवश्यक निचरा व्यवस्था पूर्ण करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून नाणीज पंचक्रोशीत अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी सायंकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील पाणी थेट सर्व्हिस रोडवरून नागरिकांच्या वस्त्यांकडे वळाले. विशेषतः अर्धवट अवस्थेत असलेल्या आऊटलेट व गटारांच्या कामांमुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा विस्कळीत झाला. परिणामी अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही दुकानांमधील साहित्याचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुरू असलेली गटारांची कामे दीर्घकाळापासून रखडलेली आहेत. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती उपाययोजना करण्याऐवजी ठेकेदार कंपनीकडून केवळ तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गतवर्षीही अशाच प्रकारे पाणी घरांमध्ये घुसले होते; मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस दुरुस्ती अथवा कायमस्वरूपी उपाय करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
भाजपा युवा पदाधिकारी चिराग खटकुळ यांनी ठेकेदार कंपनीच्या कामकाजावर कठोर शब्दांत टीका केली. “अवकाळी पावसातच जर ग्रामस्थांची ही अवस्था होत असेल, तर आगामी मान्सूनमध्ये परिस्थिती किती भयावह बनेल याची कल्पनाही करवत नाही. नागरिकांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मान्सूनला अवघे काही दिवस शिल्लक असताना नाणीज परिसरातील निचरा व्यवस्था तातडीने पूर्ण करावी, सर्व्हिस रोडलगत साचणाऱ्या पाण्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि नागरिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून आता होत आहे.
ढिसाळ कामांना प्रशासनाकडून मुकसंमती?
महामार्गाचे काम सुरू असताना दर्जा, सुरक्षितता आणि निचरा व्यवस्थेची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची असते. मात्र वारंवार तक्रारी होऊनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गतवर्षीही अशाच प्रकारे पाणी घरात घुसले होते; मग वर्षभरात उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? केवळ कागदोपत्री पाहण्या आणि बैठका घेऊन प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे का, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी या प्रकारांकडे नेमक्या कोणत्या भूमिकेतून पाहत आहेत? ग्रामस्थांच्या तक्रारी, वारंवार होणारे नुकसान आणि अर्धवट कामांची वास्तविकता दिसत असतानाही अधिकाऱ्यांची मौन भूमिका संशय निर्माण करणारी ठरत आहे. ठेकेदाराच्या ढिसाळ कामांना प्रशासनाकडून मुकसंमती दिली जात आहे का, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.

