(देवरूख)
देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटीत भालेकर स्टॉप येथे आज (शनिवारी) सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यश संतोष महाडिक (रा. निवेबुद्रुक, ता. संगमेश्वर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. यश महाडिक हा सकाळी सुमारे आठच्या सुमारास आपल्या नव्या दुचाकीवरून निवेबुद्रुक येथून देवरूखच्या दिशेने निघाला होता.
पाटगाव घाटी परिसरातील भालेकर स्टॉप येथे एका चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून देवरूखकडून रत्नागिरीकडे येणाऱ्या नॅशनल ट्रॅव्हल्स बसशी त्याची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की यश महाडिक रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रत्नागिरी येथे उपचारासाठी हलविले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा अधिक तपास देवरूख पोलीस करत आहेत.

