(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील कोकणनगर परिसरातील किर्तीनगर येथे नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाइपलाइन कामाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. रस्त्यालगत खोदलेली चर तब्बल आठवडाभर उघडीच ठेवण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, पाण्याच्या पाइपलाइन संबंधित कामासाठी रस्त्याच्या कडेला खोदाई करण्यात आली आहे. मात्र खोदाईनंतर काम पूर्ण करण्याऐवजी चर उघडीच ठेवून आता पाणी साचले आहे. कामकाज करताना पाण्याची पाइपलाइन फुटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेल्याचे सांगितले जात आहे. सध्या या चरीत हजारो लिटर पाणी साचून लहान नाल्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पाइपलाइन कामाच्या गुणवत्तेवर आणि संबंधित ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नगर परिषदेच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या कामात इतकी ढिलाई कशी? उघड्या चरीमुळे नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान, ठेकेदाराने तातडीने काम पूर्ण करून चर बुजवावी, अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारावर राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
या उघड्या चरीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुकानांसमोर साचलेले पाणी, चिखल आणि ग्राहकांना होणारा त्रास यामुळे व्यावसायिक व्यवहारांवर परिणाम होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांसह व्यापारी वर्गही संतप्त झाला असून ठेकेदाराच्या निष्काळजी कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.

