(राजापूर / तुषार पाचलकर)
महाराष्ट्र शासनाच्या “१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम” अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात ५वा क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाचा गौरव करण्यात आला आहे.
राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस, डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅनेल, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) यांचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमात रत्नागिरी पोलीस दलाने सक्रिय सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली.
‘१५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमातंर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालयांना तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालयप्रमुखांना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या विशेष मोहिमेत राज्यातील ३४ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांमधून रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाची निवड होऊन त्यांना पाचवा क्रमांक प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा सन्मान करण्यात आला. शासनाच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी पोलीस दलाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


