( मुंबई )
बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचे रविवारी ओडिशातील तलसारी बीच येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. वयाच्या ४२व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे चित्रपट क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल बॅनर्जी ‘भोले बाबा पार करेगा’ या मालिकेच्या शूटिंगसाठी तलसारी बीच येथे गेला होता. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो मुद्रात उतरला असता अचानक बुडाल्याची घटना घडली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ पाण्यातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, त्याचा श्वास सुरू होता, मात्र त्याला वाचवता आले नाही.
या घटनेबाबत अधिकृत माहिती देताना पूर्व मेदिनीपूर पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार मृत्यूचे कारण बुडणे असावे. मात्र, अचानक हृदयविकाराचा झटका आला का, याचाही तपास सुरू असून पोस्टमार्टम अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मालिकेतील सहकलाकार भास्कर बॅनर्जी यांनी सांगितले की, शूटिंग दुपारी पूर्ण झाले होते. त्यानंतर टीम निघण्याच्या तयारीत असतानाच राहुल समुद्रात बुडाल्याची माहिती मिळाली. जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आले, पण तोपर्यंत परिस्थिती गंभीर झाली होती.
या घटनेत मद्य किंवा अमली पदार्थांचा कोणताही संबंध आढळलेला नाही. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण टीम हादरली असून, चाहत्यांमध्येही शोक व्यक्त केला जात आहे.

