(दापोली / सुदेश तांबे)
दापोली तालुक्यातील असोंड येथे आजारपणाला कंटाळून 70 वर्षीय शंकर भिकू पवार या वृद्धाने राहत्या घरी लोखंडी खांबाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (3 मे) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
शंकर पवार हे मूळचे सुसेरी येथील असून ते गेल्या 35 वर्षांपासून असोंड येथे स्थायिक होते. काही वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते सतत आजारी राहत होते. शनिवारी नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा कामावर गेला होता व पत्नी लग्न समारंभासाठी बाहेर गेली होती. दुपारी चारच्या सुमारास पत्नी घरी आल्यानंतर घराच्या खांबाला पतीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
आरडाओरड झाल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गावचे पोलीस पाटील आंग्रे यांनी याबाबत दापोली पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.