(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीतील भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ काढणे आणि ब्रेकवॉटर वॉल (ग्रोयान्स टाईप) बंधारा बांधण्याच्या कामाला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तब्बल १४३ कोटी ९६ लाख रुपयांचा हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने राबवला जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश मिळाले असून पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाला हिरवा कंदील मिळाल्याचे सांगितले जाते.
या प्रकल्पात भाट्ये खाडी मुखाजवळ ब्रेकवॉटर बंधारा उभारणी आणि खाडीमुखातील गाळ काढणे या दोन प्रमुख कामांचा समावेश आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार बंधाऱ्यासाठी सुमारे ६४ कोटी २५ लाख रुपये तर गाळ काढण्यासाठी ३७ कोटी ५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
खाडी मुखात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने मासेमारीसाठी बोटी बाहेर नेणे कठीण झाले होते. परिणामी मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे खाडी मुख खुले होणार असून मच्छीमारांना सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच कोकणातील मत्स्यव्यवसायाच्या विकासाला हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

