(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
मुंबई-गोवा महामार्गावर 11 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आरवली येथील नवीन पुलावर दोन वाहनांमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. रत्नागिरीकडून मागझंकडे निघालेली मारुती आर्टिगा आणि मुंबईहून देवगडकडे निघालेली होंडाई कार यांच्यात ही धडक झाली. सुदैवाने या अपघातात दोन्ही वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून मोठा अनर्थ टळला.
या अपघाताचे कारण पुलावर लावलेला चुकीचा डायव्हर्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्धवट व चुकीच्या पद्धतीने रचलेले डायव्हर्ट वाहनचालकांच्या लक्षात न आल्याने समोरासमोरची धडक झाली.
पुलाच्या ठिकाणी योग्य प्रकारे दिशादर्शक फलक, रस्ता मोकळा करण्याची व्यवस्था, तसेच प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे वारंवार असे अपघात होत आहेत. संबंधित ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे रस्त्यावरील सुरक्षितता धोक्यात येत असून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.