(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य कोकणात पर्यटकांची अक्षरशः गर्दी उसळली असून, समुद्रकिनाऱ्यांसह खाडी परिसरातील पर्यटनाला यंदा विशेष उभारी मिळाल्याचे चित्र दिसत आहे. रत्नागिरीतील विस्तीर्ण, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण कायम असतानाच, यंदा खाडीत होणाऱ्या ‘बोट सफारी’ने पर्यटकांना अक्षरशः भुरळ घातली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील नाचणे-नारायणमळी येथील कांदळवन सफारी, पक्षीनिरीक्षण आणि कयाकिंग या उपक्रमांना अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. ‘काजळी मॅन्ग्रोव्हज टुरिझम’च्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे पर्यटकांना निसर्गाच्या कुशीत शिरण्याचा आणि जैवविविधतेचा जवळून अनुभव घेण्याचा अनोखा योग जुळून येत आहे. काजळी खाडीच्या शांत पाण्यावरून सफारी करताना पर्यटकांना किंगफिशर, स्वर्गीय नर्तक, ब्राह्मणी काईट तसेच धनेश यांसारख्या दुर्मिळ व देखण्या पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटात आणि दाट हिरव्यागार कांदळवनाच्या सान्निध्यात हा प्रवास पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरत आहे.
पर्यटनाच्या वाढत्या ओघामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बोट चालक, मार्गदर्शक, खाद्यव्यवस्था आदी माध्यमांतून अनेकांना रोजगार उपलब्ध होत आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. सफारीदरम्यान ‘लाईफ जॅकेट’चा वापर सक्तीचा करण्यात आला असून, मार्गदर्शकांच्या उपस्थितीतच बोट सफरीचे आयोजन केले जात आहे.
जैवविविधतेचा समृद्ध ठेवा
नाचणे येथील कांदळवन सफारीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आढळणारी समृद्ध जैवविविधता. महाराष्ट्रात आढळणाऱ्या २१ कांदळवन प्रजातींपैकी तब्बल ११ प्रजाती येथे पाहायला मिळतात. विशेषतः ‘सोनेरी शालबा’ या राज्यातील मानाच्या कांदळवन वृक्षाचे अस्तित्व पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे. निसर्ग पर्यटनाची ही नवी लाट केवळ पर्यटकांचे मनोरंजन करत नाही, तर कांदळवनांचे संवर्धन आणि त्यांचे पर्यावरणीय महत्त्व जनमानसात पोहोचवण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

