(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत सुमारे ३४ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर १५ वर्षांनंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली. या प्रकरणी योगेश गणपत चव्हाण (रा. नवी मुंबई) याला पाच वर्षे सश्रम कारावास व १ लाख ५५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
रत्नागिरी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी युक्तिवाद सादर केला. या खटल्यातील माहितीनुसार, आरोपीने २ फेब्रुवारी ते १० मे २०१० या कालावधीत ‘ड्रीम नॅचरल लँड डेव्हलपर्स’ या नावाने कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. ही कंपनी बंद पडल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याऐवजी ‘स्वरा इंटरप्रायझेस’ या नावाने दुसरी बेकायदेशीर कंपनी सुरू करण्यात आली. मात्र, ही कंपनी कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत नव्हती. तसेच भारतीय रिझर्व्ह बँक किंवा सेबीची कोणतीही परवानगी न घेता व्यवसाय सुरू ठेवण्यात आला. या माध्यमातून आरोपीने गुंतवणूकदारांना चार ते सहा महिन्यांत रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एकूण ३४ लाख ३५ हजार रुपये उकळले. मात्र, ही रक्कम परत न करता गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय परवाना नसताना सावकारी व्यवसायही केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार प्रभाकर कदम यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६ सह ३४, तसेच प्राइझ चीट्स अँड मनी सर्क्युलेशन (बंदी) कायदा १९७८ अंतर्गत कलम ३ व ४, तसेच सावकारी अधिनियम १९४६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपीला ६ जुलै २०१० रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला; मात्र न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बराच काळ तो गैरहजर राहिला. अखेर दुसऱ्या जिल्ह्यातील गुन्ह्यात अटकेत असताना त्याला अजामीनपात्र वॉरंटवरून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाने एकूण ३० साक्षीदार तपासले. साक्षी व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

