( रत्नागिरी )
बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शासकीय रुग्णालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यावर याप्रकरणी कारवाईची मागणी करणारे निवेदनही देण्यात आले.
शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी गोळप येथील नरेंद्र आंबेकर यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे व उपचाराअभावी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या दालनात राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो नसल्याबाबत शासन निर्णयाचा भंग व अवमान झाल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी सकारात्मक चर्चा करत अधिष्ठात्यांच्या या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचे बहुजन समाज पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर निवेदन देताना बहुजन समाज पार्टी रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, उपाध्यक्ष भारत पवार, माजी अध्यक्ष राजू जाधव, माजी महासचिव किशोर पवार, सेक्टर अध्यक्ष अनंत पवार, प्रीतम सावंत आणि जिल्हाप्रभारी अनिकेत पवार उपस्थित होते.

