(मुंबई)
महाराष्ट्र दिनानिमित्त (1 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘Missing Link’ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या लिंकमार्गामुळे मुंबई–पुणे प्रवास सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार असून, इंधनाची 15–20% बचत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, आमदार उमा खापरे, सुनील शेळके, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, एमएसआरडीसीचे अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
घाटातील वळणांना पर्याय, वाहतूक कोंडी कमी
नव्या मार्गामुळे खंडाळा घाटातील धोकादायक व वळणदार रस्त्याला मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. अंदाजे 70% वाहतूक या लिंकमार्गावर वळवली जाईल, त्यामुळे कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसाट होणार आहे. हा मार्ग खोपोली ते कुसगाव (लोणावळा) असा थेट जोडतो. सध्या मुंबई ते पुणे हा प्रवास साधारण 155 किमी असून सुमारे 3 तास लागतात. ‘Missing Link’ सुरू झाल्यानंतर हा वेळ अंदाजे 2 तास 30 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- एकूण खर्च: 6,695 कोटी रुपये
- एकत्र बोगदे:
- पहिला बोगदा – 8.92 किमी (आशियातील लांब बोगद्यांपैकी एक)
- दुसरा बोगदा – 1.75 किमी
- रुंदी: 23.5 ते 23.75 मीटर (जगातील सर्वात रुंद बोगद्यांमध्ये समावेश)
- 8-लेन क्षमता, आधुनिक व्हेंटिलेशन, लाइटिंग आणि आपत्कालीन सुविधा
या बोगद्यांची रुंदी लक्षात घेता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
650 मीटर केबल-स्टे ब्रिज: अभियांत्रिकीचा कमाल
या प्रकल्पात 650 मीटर लांबीचा केबल-स्टे ब्रिज उभारण्यात आला असून तो टायगर व्हॅली परिसरात आहे. पुलाची उंची सुमारे 180 मीटर, तर पायलॉन उंची 182–184 मीटर आहे. हा पूल ताशी 252 किमी वेगाच्या वाऱ्यांनाही तोंड देऊ शकतो, अशी रचना करण्यात आली आहे. याशिवाय 850 मीटर लांबीचा व्हायडक्ट ब्रिजही उभारण्यात आला आहे. या नव्या मार्गामुळे लोहगड किल्ला, विसापूर किल्ला आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.
‘Missing Link’चं नाव बदलणार?
उद्घाटनावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे नाव बदलण्याचे संकेत दिले. “आता काहीही ‘मिसिंग’ राहिलेले नाही. याला ‘Connecting Link’ म्हणायला हवे,” असे त्यांनी स्पष्ट करत लवकरच नव्या नावाबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे भारतातील पहिला एक्सप्रेसवे अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक बनला असून, मुंबई–पुणे दरम्यानचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे.
‘मिसिंग लिंक प्रकल्प’ बाबत माहिती
सन २००२ मध्ये मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण दुतगती मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र, सन १९९६-९७ मध्ये आखणी करताना खालापूर ते कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) दरम्यानची १३.३० कि.मी. लांबीची मिसिंग लिंक’ प्रस्तावित असली तरी आर्थिक आणि तांत्रिक अडचणींमुळे ती त्या वेळी पूर्ण करता आली नाही. परिणामी, अस्तित्वातील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील सुमारे १९ कि. मी. रस्त्याचे रुंदीकरण करून त्याचा वापर दुतगती मार्गाच्या सामायिक भाग म्हणून करण्यात आला.
सुरक्षित व गतिमान प्रवासासाठी ‘मिसिंग लिंक’
द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट दरम्यानचा रस्ता सध्या सहा पदरी आहे. या ठिकाणी द्रुतगती मार्गाच्या सहा पदरी मार्गासोबत राज्य मार्गाच्या चार पदरी मार्गाची वाहतूक एकत्र येऊन एकूण दहा पदरी वाहतूक निर्माण होते. घाट विभाग असल्याने येथे चढ-उतार जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे मुंबईकडे जाणारी डोंगरालगतची एक लेन अनेकदा बंद ठेवावी लागते. या अडचणी दूर करण्यासाठी आणि अधिक सक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरपैज दरम्यानच्या ५.८६ किमी लांबीच्या सहापदरी रस्त्याचे आठ पटरीकरण करण्यात आले आहे. तसेच खोपोली एक्झिट ते कुसगाव सिंहगड इन्स्टिट्यूट या १२.३० किमी लांबीच्या उर्वरित भागासाठी दोन बोगदे आणि दोन व्हायाडक्ट उभारण्यात आले आहेत. ५.८८ किमीच्या ८ पदरी स्टीकरणासह एकूण १९.१६ कि. मी. लांबीचा हा अत्याधुनिक मार्ग विकसित करण्यात आला आहे. दि. २९ ऑगस्ट २०१८ रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पासाठी रु. ६८९५, ३६ कोटीच्या भांडवली खर्चास तसेच स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती
जगातील सर्वाधिक रुंद बोगद्यांची निर्मिती
या प्रकल्पातील दोन बोगद्यांची उभारणी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NAIM) तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली आहे. प्रत्येकी २३.५० मीटर रुंदीचे हे बोगदे सहयादी पर्वतरांगांमध्ये खोदणे हे मोठे अभियांत्रिकी आव्हान होते. जगातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे म्हणून यांची गिनीज बुकमध्ये होण्याकरिता प्रक्रिया सुरु आहे बोगद्यांमधील विविध प्रकारच्या खडकांचे भूगर्भशास्त्रीय परीक्षण करून आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. बोगदा क्रमांक १ ची लांबी १.५८ कि. मी. असून बोगदा क्रमांक २ ची लांबी ८.८६ कि. मी. आहे. विशेष म्हणजे, दुसरा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून सुमारे १८० मीटर खाली आहे. त्यामुळे ब्लास्टिंगसारख्या कामांमध्ये मोठे तांत्रिक आव्हान होते; मात्र एमएसआरडीसीने ते यशस्वीरित्या पूर्ण केले.
टायगर व्हॅलीतील केबल-स्टेड ब्रिज अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना
या दोन बोगद्यांना जोडणारा टायगर व्हॅलीतील ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रिज हा या प्रकल्पाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. सुमारे १२५ मीटर उंचीवर उभारण्यात आलेला हा पूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे. १८२ मीटर उंचीचे दोन पायलॉन (स्तंभ) आणि एकूण २४० केबल्सच्या सहाय्याने हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलासाठी विंड टनेल टेस्ट’, ‘फॅटिंग व टेन्साइल टेस्ट’ तसेच ‘स्टे केबल टेस्टा अशा अत्याधुनिक चाचण्या विदेशात करण्यात आल्या आहेत. डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या या परिसरात महाकाय यंत्रसामग्री पोहोचविणे, तसेच वेगवान वारे आणि मुसळधार पावसात काम करणे ही मोठी आव्हाने होती. कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही सर्व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे पाळत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या नव्या मार्गामुळे घाटातील अवघड वळणे आणि अपघातप्रवण क्षेत्र टाळता येणार असून प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. तसेच, वाहनांच्या इंधनाच्या वापरात घट होऊन दररोज अंदाजे १ कोटी रुपयांची बचत होणार आहे. परिणामी, प्रदूषणातही लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील पुढील विकासासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या भागांच्या प्रगतीसाठी मिसिंग लिंक प्रकल्प भविष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

