(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरा नजीकच्या किनारपट्टीवरील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आरे वारे बीच येथे काल (रविवारी, ता. 26) रोजी एका महाकाय व्हेल माशाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. समुद्रात तरंगत असलेला हा मृतदेह किनाऱ्यालगत दिसून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली.
सायंकाळच्या सुमारास काजीरभाटी किनाऱ्यालगत पाण्यावर तरंगत असलेला हा मृत व्हेल प्रथम काही नागरिकांच्या निदर्शनास आला. समुद्राच्या लाटांमुळे तो हळूहळू किनाऱ्याकडे सरकत असल्याने मोठी गर्दी जमा झाली होती. ही बातमी परिसरात वेगाने पसरताच बघ्यांची एकच गर्दी होती.
घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि कांदळवन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भरतीच्या लाटांसोबत मृतदेह किनाऱ्यावर येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क आहे.
या व्हेलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. समुद्रातील वाढते प्रदूषण, मोठ्या जहाजाची धडक किंवा आजारपणामुळे नैसर्गिक मृत्यू अशा विविध शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

