(मुंबई)
राज्यातील नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरविणारे ‘आपले सरकार’ वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते बंद असले तरी ते लवकरच पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. या अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञ समिती युद्धपातळीवर कार्यरत असून, प्रणाली अधिक सक्षम आणि सुरक्षित बनविण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
२७ एप्रिलच्या रात्रीपासून तांत्रिक कारणास्तव बंद पडलेल्या या पोर्टलमुळे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करत असल्याने निर्माण झालेली गैरसोय लक्षात घेऊन शासनाने तातडीने उच्चस्तरीय पावले उचलली आहेत.
या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाआयटीचे पदाधिकारी उपस्थित होते. तांत्रिक अडचणींचे मूळ कारण शोधून त्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आयटी तज्ज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञान प्रमुखांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने प्राथमिक तपासणी पूर्ण केली असून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
पोर्टल अधिक सुरक्षित, स्थिर आणि वेगवान करण्यासाठी सुधारणा करण्यात येत असून, मायक्रोसॉफ्ट, डेल आणि कॉमवॉल्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी समन्वय साधून मार्गदर्शन घेतले जात आहे. सर्व तांत्रिक यंत्रणा आणि तज्ज्ञ टीम्स २४x७ कार्यरत असल्याचेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून पोर्टल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करत नागरिकांनी सहकार्य करावे व सेवा केंद्रांशी संपर्कात राहावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
‘आपले सरकार’ हे राज्यातील नागरिकांसाठी सेवा वितरणाचे महत्वाचे डिजिटल व्यासपीठ आहे. सध्या उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, प्रणाली अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. पोर्टल लवकरच पूर्ववत सुरू करून नागरिकांना अखंडित सेवा देण्याच्या सूचना मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.

