(रत्नागिरी / वार्ताहर)
विश्वसंवाद केंद्र मुुंबई या संस्थेतर्फे दिल्या जाणार्या देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी चिपळूण येथे दि. 2 मे रोजी सायंकाळी 5 वा. डीबीजे महाविद्यालयाच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच पत्रकारांना हा सन्मान दिला जाणार आहे.
भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला प्रोत्साहन देणार्या पत्रकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. कोकण विभागात हा पुरस्कार देण्यात येणार असून या बाबतची माहिती देवर्षी नारद पत्रकार सन्मान 2026चे संयोजक व विश्वसंवाद मुंबईचे स्ट्रॅटेजिक हेड डॉ. निषीध भांडारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यावर्षी विविध श्रेणीमध्ये या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
रायगड येथील ज्येष्ठ पत्रकार मेघराज जाधव तर उल्लेखनीय कार्य म्हणून सिंधुदुर्ग येथील पत्रकार शेखर सामंत, चिपळूण येथील दै. पुढारीचे प्रतिनिधी समीर जाधव, गुहागर येथील मयुरेश पाटणकर तर सोशल मीडिया माध्यमातून वृषभ तोडणकर यांना यावर्षी देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जय महाराष्ट्र न्यूजचे संपादक प्रसाद काथे, ज्येष्ठ विचारवंत व संशोधक अभिजीत जोग हे प्रमुख वक्ते म्हणून लाभणार आहेत. तसेच स्थानिक पत्रकार राजेश जोष्टे उपस्थित राहाणार आहेत. दरवर्षी विश्वसंवाद केंद्र मुंबई ही संस्था पत्रकारिता क्षेत्रात राष्ट्रनिर्माण, निर्भीड पत्रकारिता व वास्तवनिष्ठ पत्रकारिता करणार्या पत्रकारांना दरवर्षी गौरविले जाते. या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन सहयोगी संस्था नवकोकण एज्युकेशन सोसायटी चिपळूण व विश्वसंवाद केंद्र यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

