(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर कसबा येथे देशमुख कुटुंबावर अवघ्या एका वर्षात दुसऱ्यांदा दुर्दैव कोसळल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गेल्या वर्षी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने हादरलेल्या या कुटुंबावर यंदा कुटुंबप्रमुखांच्या अपघाती मृत्यूचा आघात झाला आहे.
२२ फेब्रुवारी २०२५ रोजी गजेंद्र देशमुख यांची १३ वर्षीय कन्या मृण्मयी ही इयत्ता आठवीत शिक्षण घेत असताना, तिला त्या दिवशी सकाळी शाळेत जाण्यास उशीर झाला. आईने शाळेत जाण्यास वेळेवर उठवले नाही याचा मनामध्ये राग घेऊन तिने आई घरात काम करत असतानाच घराचा दरवाजा बंद करून पडवीतील वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संगमेश्वर कसबा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त झाली होती. देशमुख कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता.
मुलीच्या निधनानंतर गजेंद्र देशमुख यांनी मोठ्या मानसिक संघर्षातून संसार सावरत पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. मात्र या घटनेला वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच नियतीने पुन्हा एकदा घाला घातला.
२० फेब्रुवारी २०२६ रोजी किराणा दुकानासाठी माल खरेदी करण्यासाठी ते कोल्हापूर येथे गेले होते. खरेदी आटोपून दुचाकीवरून संगमेश्वरकडे परतताना शाहूवाडी तालुकातील वालूर परिसरात त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात गजेंद्र देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. पन्नाशीही न ओलांडलेल्या या कुटुंबप्रमुखांचा अचानक अंत झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
मुलीच्या स्मृतिदिनाच्या अगदी दोन दिवस आधी वडिलांचे जाणे, ही घटना अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे. वर्षभरापूर्वीची शोकांतिका अजून ताजी असतानाच पुन्हा एकदा देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गावात शांत, कष्टाळू आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले गजेंद्र देशमुख कुटुंबासाठी अहोरात्र परिश्रम करणारे होते. त्यांच्या अचानक निधनाने संगमेश्वर कसबा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशमुख कुटुंबियांना धीर देण्यासाठी नातेवाईक व ग्रामस्थ पुढे येत आहेत.

