(गणपतीपुळे / वैभव पवार)
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्रीक्षेत्र गणपतीपुळेच्या स्वयंभू श्री लंबोदरच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशा कालावधीत नित्यनेमाने सायंकाळी संपन्न होणाऱ्या दीपोत्सवाची सांगता बुधवारी कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आली. या दिवशी श्रींचा गाभारा, मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावरील “मोरया”या ठिकाणचे त्रिपुर यांची विधिवत पूजाअर्चा होऊन असंख्य तेल वातीच्या दिव्यांनी, पणत्यांनी, समयांनी सर्व परिसर प्रकाशमय करण्यात आला.
सायंकाळी सात ते साडेसात या वेळेत भक्तिमय तेजोमय वातावरणात श्रींची सामूहिक आरती, मंत्रपुष्पांजली प्रार्थना अशा स्वरूपाचा विलोभनीय आणि उत्साहवर्धक कार्यक्रम पार पाडण्यात आला. याकरता संस्थान श्री देव गणपतीपुळे मंदिर ट्रस्ट यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याचे उत्तम नियोजन केले होते. यामध्ये असंख्य भक्तगण, ग्रामस्थ, पर्यटक सहभागी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने सहभागी झाले.
या वर्षी देखील या भक्तीमय सोहळ्याची साक्ष होण्यासाठी गणपतीपुळे गावातील स्थानिक ग्रामस्थ व भक्तगण पारंपरिक वेशभूषेमध्ये हजर राहिले होते. त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा खऱ्या अर्थाने वाढली तसेच हा कार्यक्रम सर्वच भाविक व पर्यटकांसाठी विशेष लक्षवेधी ठरला, अशी माहिती संस्थान श्री देव श्रीक्षेत्र गणपतीपुळे चे मुख्य पुजारी अमित प्रज्ञा प्रभाकर घनवटकर यांनी दिली.

