(रत्नागिरी / वार्ताहर)
इराकमधून एलपीजी कार्गो घेऊन पाकिस्तानकडे निघालेले वादग्रस्त ‘आमिर गॅस’ हे जहाज रविवारी सायंकाळी जयगड बंदरातील एलपीजी जेटीवर लावण्यात आले. जहाज बंदरात लागताच कस्टम, कोस्टगार्ड, डीजी शिपिंग, पोलीस तसेच इतर संबंधित तपास यंत्रणांचे अधिकारी तातडीने जहाजावर दाखल झाले आणि त्यांनी जहाजाची सखोल चौकशी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या जहाजावरील एलपीजी कार्गो जयगड बंदरात उतरवण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या तीन दिवसांपासून कस्टम आणि डीजी शिपिंगचे अधिकारी जहाजावरील कार्गो तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करत असल्याचे समजते.
दरम्यान, या जहाजाच्या मालकी हक्काबाबतही वाद निर्माण झाला आहे. जहाजाचा एक मालक असलेल्या ‘फतेह मरीन आयएनसी’ने हे जहाज बेकायदेशीरपणे जयगड बंदरात आणल्याचा आरोप ‘ब्ल्यू सी मरीन’ तसेच त्यांच्या एजंट ‘ऍटलांटिक ग्लोबल शिपिंग’ यांच्यावर केला आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे जयगड बंदर परिसरात खळबळ उडाली असून, तपास यंत्रणांच्या पुढील निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

