(देवळे / प्रकाश चाळके)
हिंदू जनजागृती आणि संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने देवळे मंडल अंतर्गत आठ गावांचे सकल हिंदू संमेलन रविवारी श्री खडगेश्वर मंदिर परिसरात उत्साहात पार पडले. अखंड भारतमाता व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अमित पंडित यांनी केले. त्यांनी सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती तसेच इतिहासातील मुघल आणि ख्रिश्चन आक्रमणांचा संदर्भ देत धर्मासमोरील आव्हानांची माहिती मांडली. हिंदू धर्म कर्तृत्वश्रेष्ठता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देतो, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते संतोष जोशी यांनी हिंदू धर्म हा केवळ धर्म नसून जीवनपद्धती असल्याचे सांगितले. कर्तव्यप्रधान संस्कृती म्हणून त्याची ओळख असून संत आणि योद्ध्यांनी त्यासाठी मोठे योगदान दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव आणि अतीसहिष्णुता ही अधोगतीची कारणे असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
डॉ. जयश्री जोग यांनी कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करताना संवादाच्या अभावामुळे कुटुंबव्यवस्था ढासळत असल्याची खंत व्यक्त केली. बदलत्या काळात कुटुंबातील संवाद पुन्हा वाढवण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
पत्रकार प्रकाश चाळके यांनी हिंदू संघटनांची आवश्यकता मांडली. इतर धर्मांमध्ये संघटितपणा दिसतो, मात्र हिंदू समाजात त्याचा अभाव असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.
समारोपात संयोजक दिलीप शिर्के यांनी जातीपातीच्या राजकारणावर टीका करत राष्ट्रहितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. जातनिहाय जनगणना समाजात फूट पाडणारी ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.
या संमेलनाच्या आयोजनात प्रशांत शिंदे यांचे विशेष योगदान होते. सूत्रसंचालन राजेंद्र मावळणकर यांनी केले. घाटीवळे, चोरवणे, करंजारी, देवळे, चाफवली, मेघी, कनकाडी आणि दाभोळे या गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

