(मुंबई)
‘सरके चुनरी तेरी’ या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर अभिनेता संजय दत्त यांनी सोमवारी राष्ट्रीय महिला आयोग समोर हजेरी लावून लेखी माफी सादर केली. या गाण्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल खंत व्यक्त करत, प्रायश्चित्त म्हणून 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचे प्रायोजकत्व स्वीकारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.
आयोगाकडून कडक भूमिका
राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. गाण्यातील अश्लीलता आणि महिलांचे अयोग्य सादरीकरण यावर आयोगाने तीव्र आक्षेप नोंदवला. सार्वजनिक जीवनातील प्रसिद्ध कलाकारांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत राहून काम करावे, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले.
या प्रकरणावर उत्तर देताना संजय दत्त यांनी भविष्यातील सर्व प्रकल्पांमध्ये महिला आणि मुलांच्या सन्मानजनक सादरीकरणासाठी विशेष कायदेशीर तरतुदी समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी यापुढे अशा प्रकारच्या वादग्रस्त सादरीकरणापासून दूर राहण्याची भूमिकाही स्पष्ट केली.
नोरा फतेहीला समन्स
या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही हिलाही आयोगाने पाचारण केले होते. मात्र ती सध्या परदेशात असल्याने तिने सुनावणीसाठी नवीन तारीख मागितली आहे. यापूर्वी 6 एप्रिल रोजी या गाण्याचे दिग्दर्शक किरण कुमार उर्फ प्रेम, गीतकार रकीब आलम आणि निर्मिती संस्थेचे प्रतिनिधी राष्ट्रीय महिला आयोग समोर हजर राहून माफी मागितली होती. वाद वाढल्यानंतर हे गाणे सध्या युट्युबवरून हटवण्यात आले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य vs सामाजिक जबाबदारी
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना आयोगाने स्पष्ट केले की, कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे असले तरी ते सामाजिक संवेदनशीलतेच्या मर्यादेत राहणे आवश्यक आहे. ‘सरके चुनरी तेरी’ वादामुळे मनोरंजन क्षेत्रात पुन्हा एकदा कंटेंटची जबाबदारी आणि नैतिकता हा मुद्दा चर्चेत आला असून, पुढील काळात अशा प्रकरणांवर अधिक कडक भूमिका घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

