(मुंबई)
‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. कार्यक्रम संपताच झी मराठीने सोशल मीडियावर नवा प्रोमो शेअर करत ‘आता कमबॅक होणार’ असं कॅप्शन दिलं आणि चर्चांना उधाण आलं. या प्रोमोमध्ये दोन अभिनेते संवाद साधताना दिसत होते, मात्र त्यांचे चेहरे दाखवण्यात आले नव्हते. तरीही आवाजावरून चाहत्यांनी डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांना ओळखलं आणि हा अंदाज खरा ठरला.
झी मराठीने अधिकृतपणे निलेश साबळे आणि भाऊ कदम यांच्या कमबॅकची घोषणा केली. मात्र ते कोणता कार्यक्रम घेऊन येणार, याबाबत गूढ कायम होतं. अखेर आता झी मराठीने नवा प्रोमो रिलीज करून कार्यक्रमाचं नाव जाहीर केलं आहे.
झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये मालिकांच्या नायिका “देखो वो आ गया” असं म्हणताना दिसतात आणि त्यानंतर डॉ. निलेश साबळे यांची डॅशिंग एन्ट्री होते. या प्रोमोसोबत वाहिनीने जाहीर केलं की नव्या कार्यक्रमाचं नाव आहे ‘उगाच अवॉर्ड्स’. या शोमधून निलेश साबळे आणि भाऊ कदम प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
प्रोमो शेअर करत झी मराठीने लिहिलं आहे, “ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय, डॉक्टर घेऊन येत आहेत तो सोहळा! #उगाच… महाराष्ट्राला खळखळून हसवायला येत आहेत ‘उगाच अवॉर्ड्स’ — २८ डिसेंबरपासून संध्याकाळी ७ वाजता.”
‘उगाच अवॉर्ड्स’च्या प्रोमोला सोशल मीडियावर भरघोस प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचा विनोद पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
दरम्यान, या अवॉर्ड्सची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. अनेक कलाकारांना हटके आणि विनोदी नामांकनं देण्यात आली असून, ‘सर्वोत्कृष्ट झोलर अवॉर्ड’, ‘सर्वोत्कृष्ट नट्टापट्टा अवॉर्ड’ अशी मजेशीर नावं या अवॉर्ड्सना देण्यात आली आहेत. त्यामुळे ‘उगाच अवॉर्ड्स’ हा शो मनोरंजनाचा धमाका ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

