( मुंबई )
गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक’ हा मराठी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटाच्या नावाला हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला होता. हिंदू जनजागृती समिती, समस्त हिंदू आघाडी अशा संघटनांनी आधीच इशारा दिला होता की हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. यानंतर पुण्यातील दोन ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे शो बंद पाडले.
या गदारोळानंतर मृण्मयी आणि त्यांच्या टीमने चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. आता ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचे नवीन शीर्षक आणि नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ चित्रपट ‘तू बोल ना’ या नव्या नावासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तू बोल ना’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर येत्या गुरुवारी, १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
मृण्मयी देशपांडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले, की चित्रपटाचं नवीन नाव आहे ‘तू बोल ना’. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, ‘तू बोल ना’ – ‘मना’चे श्लोक’ चा प्रवास नव्या नावाने सुरू होतोय, पण त्याच उत्साहाने! मनवा आणि श्लोक यांच्या ‘मनां’बरोबरच्या प्रवासाला सुरुवात करूया १६ ऑक्टोबर पासून… ‘तू बोल ना’ In Cinemas 16th October 2025.”
हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते पराग गोखले यांनी सांगितले की, “‘मनाचे श्लोक’ हा ग्रंथ भक्तीभावाने पूजनीय आहे. त्याचं नाव मनोरंजनासाठी वापरणं श्रद्धेचा अपमान आहे आणि धार्मिक भावनांना ठेस पोहोचवेल.” तसेच, समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती की, “दिग्दर्शकांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक प्रतीकांचा गैरवापर थांबवावा. जर हा चित्रपट अशा नावाने प्रदर्शित झाला, तर आम्ही आंदोलन करू.”
सज्जनगड येथील समर्थ सेवा मंडळाने चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने गुरूवारी ‘मना’चे श्लोक’ प्रदर्शनास संमती दिली. मात्र पुण्यातील काही ठिकाणी चित्रपटाचे शो बंद पडले.
नाव बदलण्याचा निर्णय
या सर्व गोंधळानंतर, निर्मात्यांनी प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये, थिएटर्स आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळावे, यासाठी चित्रपट नव्या नावाने आणि नव्या जोमानं पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी म्हटलं, “गेले काही दिवस आमच्यासाठी कठीण काळ होता, परंतु रसिक प्रेक्षक, सोशल मीडियाचा पाठिंबा आणि हिंदी–मराठी चित्रपटसृष्टीचा अभूतपूर्व पाठिंबा आम्हाला खूप बळ देऊन गेला. आता आम्ही पुन्हा एकदा नव्या नावाने, नव्या ऊर्जेनं चित्रपट प्रदर्शित करत आहोत. रसिकांना हा चित्रपट आता सुविहित पाहता येईल.”

