(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील एस.एन. कानडे आयडियल हायस्कूल, देवळे येथील दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात कुमारी समीक्षा बोडेकर आणि कु. अर्णव गार्डी यांनी गुणवत्ता यादीत झळकून शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली. गुणवत्ता यादीत स्थान मिळाल्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये प्रमाणे वार्षिक 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच संस्थेचे पदाधिकारी व पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विशेष म्हणजे, समीक्षा बोडेकर ही विद्यार्थिनी इस्रो-नासा उपक्रमासाठीही निवड झाली होती आणि तिने नासाला भेट देण्याची संधीही मिळवली आहे.
शाळेने आपली यशस्वी परंपरा कायम राखत पुन्हा एकदा एनएमएमएस गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने पंचक्रोशीतून शाळा आणि विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

