( नवी दिल्ली )
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा परिणाम भारतातील एलपीजी गॅस पुरवठ्यावर होत असल्याची चर्चा आहे. काही भागांत नव्या गॅस सिलिंडर कनेक्शनवर तात्पुरती मर्यादा आणण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी सरकार पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) कनेक्शनला प्रोत्साहन देत आहे. मात्र नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारत सध्या 15 हून अधिक देशांतून कच्चे तेल आणि गॅस आयात करत असून, पुरवठा सुरळीत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
सध्या दर स्थिर, पण मेमध्ये बदल शक्य
26 एप्रिल रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या प्रमुख शहरांमध्ये 14.2 किलो घरगुती सिलिंडरची किंमत 910 ते 950 रुपयांच्या दरम्यान आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय च्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी देशात गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता मे महिन्यात दरात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुरवठा 70% पर्यंतच मर्यादित
फेब्रुवारी महिन्यात जागतिक तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला होता. सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुमारे 70 टक्क्यांपर्यंत करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी पीएनजी कनेक्शनचा वापर वाढवावा, असा आग्रह सरकारकडून करण्यात येत आहे.

