(संगमेश्वर)
तालुक्यातील कोंडगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर साखरपा-देवरुख मार्गावर आज (शनिवारी) दुपारी भीषण अपघात झाला. चौदा चाकी ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराला जोरात धडकल्याने चालक गंभीर जखमी झाला. ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत विठ्ठल शिंगटे (वय ४६) हे रिकामा ट्रक (क्र. UP 35 AT 1292) घेऊन देवरुख मार्गे कोल्हापूरकडे जात होते. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन डोंगराला धडकला. अपघातानंतर चालक ट्रकमध्येच अडकून पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक ग्रामस्थ विद्यासागर तांदळे, पारस साखरे, अंकुश सुर्वे, साहिल चव्हाण, मुरलीधर पांचाळ यांच्या मदतीने तसेच रवी इन्फ्रा कंपनीच्या हायड्रा मशीनच्या सहाय्याने जखमी चालकाला ट्रकमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर त्याला तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबत पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू आहे.

