(साखरपा / भरत माने)
“मी केवळ तन्वी कोलते म्हणून नाही, तर कोंडगाव–साखरप्याची लेक म्हणून संपूर्ण देशात नाव कमावणार,” असे भावनिक मत ‘बिग बॉस मराठी’ पर्व ६ ची महाविजेती तन्वी कोलते हिने व्यक्त केले.
स्पर्धेतील अनुभव सांगताना ती म्हणाली, “माझ्यासमोर अनेक दिग्गज स्पर्धक होते. त्यांच्यात माझा टिकाव लागेल का, असे अनेक प्रश्न मनात होते. मात्र जिद्द, चिकाटी, संयम आणि ठाम उद्दिष्ट यांच्या जोरावर मी हे यश मिळवू शकले.” आपल्या गावाशी असलेली नाळ अधोरेखित करताना “मी कोंडगाव–साखरप्याची मुलगी आहे, हे सांगताना अभिमान वाटतो,” असेही तिने नमूद केले.
या यशाचे श्रेय देताना तन्वी म्हणाली, “माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांमुळे हे शक्य झाले.” वडिलांची आठवण काढताना ती भावूक झाली. “आज हे यश पाहायला वडील असते तर अधिक आनंद झाला असता,” असे ती म्हणाली. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. मात्र भाऊ चिन्मयचा ठाम पाठिंबा, आई शर्मिला यांची साथ आणि आजी उषा यांचे आशीर्वाद हेच तिच्या प्रेरणेचे स्रोत ठरल्याचे तिने सांगितले.
यावेळी कोंडगाव ग्रामस्थांतर्फे तन्वीचा सत्कार बापू शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आकांक्षा कदम, माजी सरपंच बापू शिंदे, सरपंच श्रद्धा शेट्ये, ग्रामपंचायत सदस्या स्वरदा केतकर, ज्येष्ठ नागरिक आबा सावंत, माजी पोलीस पाटील मारुती शिंदे, प्राचार्य संजय बाईंग, रुपाली किर तसेच मोठ्या संख्येने महिला, तरुणी, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

