(रत्नागिरी / वार्ताहर)
इराकमधून पाकिस्तानकडे निघालेले एलपीजी गॅस वाहतूक करणारे ‘आमिर गॅस’ हे जहाज अचानक मार्ग बदलून जयगड बंदराच्या दिशेने आणल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात जहाजाचा कप्तान आणि व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीविरोधातच दुसऱ्या भागीदार मालकाने बेकायदेशीर हालचालींचा आरोप करत तक्रार केली आहे.
नियोजित प्रवासात बदल, संशय वाढला
माहितीनुसार, ‘आमिर गॅस’ हे जहाज इराकमधील खोर अल झुबेर बंदरातून पाकिस्तानातील बिन कासिम बंदरासाठी रवाना झाले होते. या जहाजावर एलपीजी गॅसचा कार्गो दुबईस्थित झांग यूनियन इंटरनॅशनल एलएलसी एफझेड या निर्यातदार कंपनीने पाकिस्तानातील अल पेट्रो गॅस प्रा. लि., लाहोरसाठी लोड केला होता. मात्र प्रवासादरम्यान जहाजाचा मार्ग अचानक बदलण्यात आला. ब्लू सी मरीन आयएनसी या व्यवस्थापन कंपनीच्या सूचनेनुसार कप्तानाने जहाज जयगड बंदराच्या बाहेरील हद्दीत आणून नांगर टाकल्याचा आरोप आहे.
जयगडमध्ये कार्गो उतरवण्याची हालचाल
यानंतर जहाजावरील एलपीजी गॅस जयगड येथील जेएसडब्ल्यू बंदरात उतरवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समोर आले आहे. यासाठी ऍटलांटिक ग्लोबल शिपिंग या एजंटमार्फत कस्टम व बंदर प्राधिकरणाकडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली. सदर जहाजाला जयगडमधील एलपीजी जेटीला लावण्याचे नियोजनही करण्यात येत होते.
भागीदार मालकाची कायदेशीर कारवाई
दरम्यान, जहाजाचे भागीदार मालक फतेह मरीन आयएनसी यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणात आक्षेप घेत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. वकील आश्विन शंकर यांच्या माध्यमातून जेएसडब्ल्यू जयगड बंदर, डी. जी. शिपिंग , सीमाशुल्क विभाग, पोलीस व इतर संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या तक्रारीत जहाज बेकायदेशीरपणे जयगड बंदरात आणण्यात आले असून, एलपीजी कार्गो संदर्भात चुकीची कागदपत्रे सादर करून तो माल उतरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घडामोडीनंतर फतेह मरीन आयएनसीने रत्नागिरीतील युनिक मरीन एजन्सीला अधिकृत एजंट म्हणून नियुक्त केले आहे. या एजन्सीचे प्रतिनिधी सहल कर्लेकर संबंधित विभागांसमोर कंपनीची बाजू मांडत आहेत.
पाकिस्तानात जाणारे जहाज अचानक जयगडकडे वळवण्यात आल्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. आता डी. जी. शिपिंग , बंदर प्राधिकरण, सीमाशुल्क विभाग आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणा यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

