(रत्नागिरी / वार्ताहर)
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिर परिसरात ‘एक घर – एक तुळस’ या संकल्पनेतून तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी, सौ. प्रिया साळवी आणि सौ. संगीता भोवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अभिनव उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भाविकांना ३५० तुळशीच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
आषाढी एकादशीनिमित्त मारुती मंदिर ते श्री विठ्ठल मंदिर अशी पारंपरिक दिंडी आणि वारीचे आयोजन करण्यात आले होते. मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून वारीला प्रारंभ झाला. विठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
यावेळी रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना “हरित रत्नागिरी” साकारण्यासाठी अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. नगरसेविका मेधा कुळकर्णी यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर श्री विठ्ठल मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते भाविकांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, भारतीय जनता पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते तथा नगरसेवक राजेश तोडणकर, नगरसेवक राजू कीर, नगरसेविका सौ. प्रिती सुर्वे, जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सौ. ऋतुजा कुळकर्णी, विभागप्रमुख मनोज साळवी, उपविभाग प्रमुख नरेंद्र देसाई, सौ. संगीता सुर्वे, सौ. वेदिका पावसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका मेधा कुळकर्णी म्हणाल्या, “आषाढी एकादशी हा केवळ भक्तीचा उत्सव नसून समाजात संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्याचीही संधी आहे. तुळस ही आपल्या संस्कृतीतील पावित्र्य, श्रद्धा आणि निरोगी जीवनाचे प्रतीक आहे. प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले गेले तर पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल आणि भारतीय संस्कृतीचे जतनही होईल. ‘एक घर – एक तुळस’ हा संकल्प प्रत्येक कुटुंबाने स्वीकारावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.”
या उपक्रमासाठी आवश्यक तुळशीची रोपे समर्थ एक्झॉटिका, मारुती मंदिर येथील सौ. कोमल तावडे यांनी ‘ना नफा – ना तोटा’ या तत्त्वावर उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या सहकार्याबद्दल आयोजकांनी विशेष आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. प्रिया साळवी (उपशहर प्रमुख), सौ. सीमा कदम (विभागप्रमुख), सौ. संगीता भोवड, सौ. वेदिका पावसकर तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे आषाढी एकादशीचा उत्सव अधिक अर्थपूर्ण ठरल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

