(संगमेश्वर / एजाज पटेल)
दारूच्या नशेत तोल गमावलेल्या एका व्यक्तीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात गोंधळ घालत थेट डॉक्टरांशीच वाद घातल्याची गंभीर घटना समोर आली आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी आरडाओरडा करत शांततेचा भंग करणाऱ्या रविंद्र भागोजी जाधव याच्यावर संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जाधव हा मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयात आला. त्याने मोठ्याने आरडाओरडा करत, विचित्र हालचाली करत परिसरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित अनंत मोरे यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधवने उलट डॉक्टरांशी हुज्जत घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली.
घटनेची गंभीर दखल घेत डॉ. मोरे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. एस. कोष्टी यांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ (१) (२), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११७ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. व्ही. मनवल करत असून, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. रुग्णालयात घडलेल्या या प्रकारामुळे आरोग्यसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

