(मुंबई)
पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी (भाजप) ने महाराष्ट्रात मोठा संघटनात्मक फेरबदल करत जिल्हानिहाय प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची यंत्रणा अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
कोकणात पक्षाची पकड अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिण जिल्ह्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा निर्णय संघटन विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
तसेच, सिंधुदुर्गसाठी आमदार योगेश सागर, रत्नागिरी उत्तरसाठी प्रशांत ठाकूर, तर रत्नागिरी दक्षिणसाठी निरंजन डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड उत्तर भागाची धुरा अतुल काळसेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
ठाणे आणि नवी मुंबई या महत्त्वाच्या शहरी भागांसाठीही पक्षाने विशेष रणनीती आखली आहे. ठाणे शहरासाठी विक्रांत पाटील, ठाणे ग्रामीणसाठी भाजप उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईत शशिकांत कांबळे, कल्याणमध्ये जयप्रकाश ठाकूर, तर उल्हासनगरमध्ये नाना सूर्यवंशी यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पालघर सारख्या आदिवासी बहुल आणि संवेदनशील जिल्ह्यासाठी राणी द्विवेदी यांची निवड करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात, नाशिक दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली असून, नाशिक शहरासाठी मंगेश चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. धुळे शहरात माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली असून, धुळे ग्रामीणसाठी रवींद्र अनासपुरे यांची निवड झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात रोहिणी नायडू, अनुप अग्रवाल आणि प्रदीप पेशकार यांच्याकडे विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अहिल्यानगर उत्तर भागासाठी लक्ष्मण सावजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या व्यापक फेरबदलामुळे भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यास चालना मिळणार असून, राज्यभरात पक्षाची उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे.
.

