(खेड / रत्नागिरी)
अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ६८ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका सराईत आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे. गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (वय ३२, रा. साखरोली, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो सौदी अरेबियातून मुंबईत दाखल होताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणात आरोपीने एका महिलेशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला आणि तिचे खासगी फोटो व व्हिडिओ मिळवले. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर तसेच महिलेच्या पतीला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याने खंडणीची मागणी सुरू केली. सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने पीडितेकडून तब्बल ६८ लाख रुपये ऑनलाइन व्यवहारांद्वारे उकळले. जानेवारी २०२६ मध्ये आरोपी सौदी अरेबियात नोकरीसाठी गेला होता, मात्र तिथूनही त्याने पैशांसाठी दबाव टाकणे सुरूच ठेवले. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्या पतीला अश्लील फोटो पाठवून मानसिक छळ अधिक वाढवला.
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी १८ एप्रिल २०२६ रोजी सौदीहून मुंबईत परतणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहीरे यांच्या पथकाने मुंबईत सापळा रचला. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला आणि तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला अटक करण्यात आली.
अटकेनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे ७ लाख रुपयांची चारचाकी गाडी, आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा हे दोन महागडे मोबाईल फोन तसेच पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला उद्यापर्यंत (२३ एप्रिल) पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या सायबर ब्लॅकमेलिंगला बळी न पडण्याचे आवाहन करताना सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.

