(नवी दिल्ली)
वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सुरू होताच सामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या सरकारी प्रक्रिया, आर्थिक जबाबदाऱ्या आणि कागदपत्रांच्या अंतिम तारखा जवळ आल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत काही कामे पूर्ण करणे अनिवार्य असून, डेडलाईन चुकल्यास मोठा दंड, व्याज किंवा कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः वाहनधारक, करदाते आणि सरकारी योजनांचे लाभार्थी यांनी या अंतिम तारखांना अत्यंत गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.
सध्या महाराष्ट्रासह देशातील वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. वाहनावर HSRP नसेल तर 5,000 ते ₹10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करूनही नंबर प्लेट न घेतल्यास 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे हे काम शेवटच्या क्षणावर ठेवणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
करदात्यांसाठी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे PAN–आधार लिंक करणे. केंद्र सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली असून 31 डिसेंबर 2025 ही त्यासाठी अंतिम तारीख आहे. PAN–आधार लिंक न केल्यास तुमचा PAN अवैध ठरेल, ज्यामुळे बँक व्यवहार, गुंतवणूक, ITR फाइलिंग, लोन प्रक्रिया आणि इतर आर्थिक व्यवहार थांबू शकतात. इतकेच नव्हे तर 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो. आधार–PAN लिंक नसल्यास आयकर विवरणपत्र (ITR) फाइल करणे कठीण होईल, रिफंडही अडकू शकतो.
आर्थिक वर्ष 2024–25 साठी विलंबित ITR (Belated Return) फाइल करण्याची शेवटची तारीखसुद्धा 31 डिसेंबर आहे. ही डेडलाईन चुकल्यास करदात्यांना लेट फी, दंड आणि व्याज भरावे लागेल आणि रिफंडचा लाभही मिळणार नाही. ज्यांची वार्षिक करदेयता 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनी ॲडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता 15 डिसेंबरपूर्वी भरणे बंधनकारक आहे. विलंब केल्यास व्याजासह अतिरिक्त दंड आकारला जाईल.
महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचे E-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख देखील 31 डिसेंबर आहे. आधार–मोबाईल लिंक नसल्यास किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास लाभार्थी महिलांचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते. नैसर्गिक आपत्तीमुळे ही अंतिम मुदत वाढवण्यात आली असली तरी आता ही शेवटची संधी मानली जात आहे.
डिसेंबर महिन्यातील या सर्व महत्त्वाच्या प्रक्रियांमुळे प्रशासनाने नागरिकांना वेळेत सर्व कामे पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत HSRP नंबर प्लेट, PAN–आधार लिंकिंग, ITR फाइलिंग, ॲडव्हान्स टॅक्स आणि E-KYC सारखी कामे न केल्यास आर्थिक नुकसान, कायदेशीर अडचणी आणि सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे वर्ष संपण्यापूर्वी ही अनिवार्य कामे तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

