(रत्नागिरी)
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व टीम कोकण कोस्टल चे सायकलिस्ट व धावपटू श्री सौरभ रावणांग यांनी सांगली येथे आयोजित एस ३ ड्युएथलॉन स्पर्धेमध्ये (१ तास ११ मिनीटे व २० सेकंद) सायकलिंग व धावून प्रथम क्रमांक पटकावला. क्लबचे दुसरे खेळाडू विनायक पावसकर (1:17:20) यांनी शासकीय कर्मचारी गटातून पाचवा क्रमांक मिळवला. क्लबच्या एकूण ९ सायकलिस्टनी यात भाग घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. सांगली येथे रविवारी ही स्पर्धा झाली. या सर्व खेळाडूंचे कौतुक आज सकाळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या दी स्पोर्ट्स कल्चर या कार्यालयात पुष्परोपटे देऊन करण्यात आले.
सांगली येथे झालेल्या ड्युएथलॉन स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष होते. या स्पर्धेत सुरवातीला ५ किलोमीटर धावणे, २० किलोमीटर सायकल चालवणे आणि पुन्हा २.५ किलोमीटर धावायचे होते. यामध्ये चांगली धाववेळ नोंदवत व सायकलिंग करत सौरभने यश मिळवले.
या स्पर्धेविषयी सौरभ रावणंग याने सांगितले की, मी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व कोकण कोस्टल टीम तर्फे या स्पर्धेत उतरलो. अतिशय आव्हानात्मक ही स्पर्धा होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सायकलचा उपयोग मला या स्पर्धेसाठी झाला व मी प्रथम क्रमांक पटकावला. माझ्यासोबत क्लबचे अन्य खेळाडूही होते. त्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. पुढील वर्षी कामगिरी अजून प्रगती करण्यासाठी सातत्याने कठोर मेहनत घेणार आहे.
या स्पर्धेमध्ये विवेक खानविलकर (01:30:19), रामांजुल दीक्षित (01:21:54), उज्ज्वल बापट (01:33:09), राजेंद्र भावे (01:46:17), राहुल गायकवाड (01:58:07), प्रशांत सातपुते (01:37:45) आणि स्पर्धेच्या ब्रॅंड अॅंबेसिडर स्नेहल भिसे (02:12:55) यांनीही स्पर्धा पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग) राहुल गायकवाड आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते तसेच २ महाराष्ट्र एनसीसी युनिटचे कमांडिंग ऑफिसर रामांजुल दीक्षित यांनीही या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली आहे.
या सर्व खेळाडूंचे अभिनंदन रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, केसीएमतर्फे सोमवारी सकाळी दी स्पोर्ट्स कल्चर या कार्यालयात करण्यात आले . याप्रसंगी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे व टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन चे सदस्य उपस्थित होते.

