(चिपळूण)
मिरजोळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री. कासम नूरमहमद दलवाई यांचे आज (बुधवार दि.२४ डिसेंबर रोजी) पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मिरजोळी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत्यू समयी ते ६९ वर्षाचे होते.
सन २०१९-२५ या पाच वर्षाच्या कार्यकाळात गावातील अंतर्गत रस्ते, गटारे, स्मशानभूमी, पाणी योजना, जिल्हा परिषद डिजिटल शाळा सुरू करणे आदी कामे पूर्ण करत गावातील अनेक विकासकामात त्यांचे मोठे योगदान आहे.
सन २०१९ मध्ये मिरजोळी ग्रामपंचायतमध्ये कासम दलवाई यांचे पॅनल निवडून येऊन ते सरपंच पदावर विराजमान झाले. त्यानंतर चार वर्षात त्यांनी गाव सुजलाम सुफलाम केले असून मिरजोळी गावाचा कायापालट केला. मिरजोळी गावात त्यांनी विकासकामाची गंगा आणली.
मिरजोळी गाव चिपळूण शहर लगात असल्याने गावाचा विकास झपाटाने वाढत आहे. याबाबत बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना कचऱ्याची मोठी समस्या असल्याचे त्यांचा लक्षात आल्याने त्याने कचरा प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले. गावातील ग्रामस्थांचा विरोध असताना श्री. दलवाई यांनी लोकांची समजूत काढून घंटागाडी सुरू करून कचऱ्याची समस्या सोडवली.
मिरजोळी गावात अनेक वाड्या डोंगर भागात वसलेल्या आहेत. त्यामुळे गावात पाण्याची मोठी समस्या होती. निवडून आल्यानंतर श्री. दलवाई व त्यांच्या कमिटीने महिलांच्या डोक्यावरचे हांडे उतरू असे जाहीरनाम्यात मांडले होते. त्याप्रमाणे मिरजोळी गावात पाण्याची समस्याही सोडवण्याचा त्यांचे मोठे योगदान आहे.
श्री. कासम दलवाई हे सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवणारे, लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. सरपंचपदाच्या माध्यमातून त्यांनी गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ग्रामविकासाची कामे तसेच सामाजिक सलोखा जपण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले.
त्यांचा स्वभाव शांत, मनमिळावू आणि मदतीचा असल्याने ते सर्व समाजघटकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली निधनाने गावाने एक संवेदनशील आणि जबाबदार लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातू, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.

