(चिपळूण)
शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ आणि उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाग भागातील महिलांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त खास नवदुर्गा दर्शन उपक्रम उत्साहात पार पडला.
या वर्षीच्या उपक्रमात दोन दिवसांत तब्बल २०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. बुधवार, दि. २४ सप्टेंबर रोजी दोन गाड्या, तर गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सहा गाड्या, अशा एकूण आठ गाड्यांमधून महिलांनी देवींच्या दर्शनासाठी रवाना झाले.
यात्रेची सुरुवात पाग येथील सुकाईदेवी मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आली. या वेळी माजी नगरसेविका सौ. सईताई चव्हाण व श्री. सुयोग चव्हाण यांच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. स्थानिक नागरिक व ज्येष्ठ महिलांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून देवीदर्शनाची सुरुवात करण्यात आली.
उपक्रमात सहभागी महिलांना मार्गदर्शन करताना श्री. सुयोग चव्हाण यांनी सांगितले, “शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या प्रेरणेतून गेली अनेक वर्षे महिलांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून महिलांना एकाच दिवशी अनेक देवींच्या दर्शनाचा लाभ मिळतो, तसेच समाजातील एकोप्याला चालना मिळते.”
या यात्रेत महिलांनी पाग सुकाईदेवी, गोवळकोट करंजेश्वरी मंदिर, मिरजोळी महालक्ष्मीदेवी, तुरंबव शारदा देवी, टेरव भवानीमाता, खेर्डी सुकाईदेवी, कुंभार्ली महाकालीदेवी, दादर श्रीरामवरदयनी देवी व वालोपे झोलाईदेवी अशा एकूण नऊ देवींच्या दर्शनाचा लाभ घेतला. एका दिवसात नऊ देवींचे दर्शन घेण्याचा अद्वितीय अनुभव महिला भगिनींना लाभला.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी नगरसेविका सौ. सई सुयोग चव्हाण, सौ. रश्मी रमेश पड्याळ, सौ. अन्वी मोरे, सौ. रुपाली गोरीवले, सौ. कोमल नाचणकर, सौ. अपर्णा पवार, सौ. विद्या लटके, सौ. सायली येलकर, सौ. संपदा सावंत, सौ. पूनम शिंदे, सौ. विनीती सावंत, सौ. स्नेहा चितळे आदींनी विशेष मेहनत घेतली.
सदर उपक्रमात सहभागी महिलांनी अनुभव व्यक्त करताना सांगितले, “दररोजच्या धावपळीत आणि घरकामाच्या व्यापात आपण स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. मात्र अशा उपक्रमामुळे आपल्याला श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक एकत्रितपणाचा अनुभव मिळतो. एकाच दिवसात नऊ देवींचे दर्शन घेण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला.”
पाग भागातील महिलांच्या नवदुर्गा दर्शन यात्रेला दरवर्षी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा समाजातील एकोप्याचे प्रतीक ठरत असून, महिलांना मिळणारी ही संधी केवळ श्रद्धेपुरती मर्यादित न राहता समाजातील बांधिलकी व सहभाग वाढवणारी ठरते.

