(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव आणि आसमंत फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ‘मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक व प्रशिक्षण’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम आसमंत फाउंडेशनच्या महिला सबलीकरण उपक्रमांतर्गत शिरगाव येथील परिषद दालनात आयोजित करण्यात आला.
या उपक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आसमंत फाउंडेशनकडून आर्थिक सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मत्स्य व्यवसायाचा शाश्वत विकास साधण्यासाठी मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती अत्यावश्यक असल्याचे सांगितले. पकडलेल्या मासळीवर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार केल्यास मच्छीमारांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्घाटनप्रसंगी डॉ. आसिफ पागरकर, चिन्मय दामले (जलजीविका संस्था), तसेच अभिषेक कात्रे (लोककल्प फाउंडेशन) उपस्थित होते. या प्रशिक्षणात एकूण ६९ महिला सहभागी झाल्या. उमेद-क्रांती प्रभाग संघातील तिवंडेवाडी, बसणी, शिरगाव आणि काळबादेवी येथील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रशिक्षणादरम्यान कोलिम चटणी, कोळंबी लोणचे, कालवांचे लोणचे, बोंबील चटणी आणि मत्स्य चकली यांसारख्या पदार्थांचे प्रात्यक्षिक तज्ज्ञांनी सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी डोंगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदिनी शेटये यांनी केले. सर्व सहभागी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी सोनाली शिवलकर यांनी मनोगत व्यक्त करत प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, जलजीविका संस्था, लोककल्प फाउंडेशन तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे कोकणातील महिलांना घरबसल्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचा आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाचा मार्ग अधिक भक्कम होणार असल्याचे स्पष्ट झाले.

