(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मिरजोळे येथील नाखरेकरवाडी परिसरात झाडीझुडपांच्या आडोशात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर रत्नागिरी शहर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास मिरजोळे, नाखरेकरवाडी येथील झाडीझुडपांच्या भागात आरोपी सुनिल सदाशिव जाधव (वय ५४, रा. मिरजोळे, बौद्धवाडी) हा बेकायदेशीरपणे, कोणताही परवाना नसताना गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकत कारवाई केली. या वेळी आरोपीकडून गुळ-नवसागर मिश्रित सुमारे २६०० लिटर कुजके रसायन, तयार दारू तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये २०० लिटर क्षमतेची १३ बॅरल, दोन प्लास्टिक बॅरल, २० लिटर क्षमतेचे कॅन, अल्युमिनियम डेग, लाकडी चाटू व इतर उपकरणांचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १,०७,००० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद बाबल्या कांबळे (वय ३८) यांनी फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ब), (क), (ड), (फ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
गेल्या काही काळात बेकायदेशीर हातभट्टी दारूचा व्यवसाय झाडीझुडपांत, वाड्यावस्त्यांत आणि गावांच्या आडोशाला फोफावत होता. कायद्याचा उघडपणे होणारा भंग या सगळ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणजेच आता पोलिसांची ही धडक मोहीम. मिरजोळेतील कारवाईने एक गोष्ट स्पष्ट केली. “आता कुणालाही सूट नाही.” हजारो लिटर कुजके रसायन, तयार दारू आणि साहित्य जप्त होणे म्हणजे हा उद्योग किती खोलवर रुजला आहे, याचे ज्वलंत उदाहरण आहे. मात्र, याचबरोबर पोलिसांनी दाखवलेली तत्परता ही तितकीच निर्णायक ठरत आहे.

