(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन केल्याने एका विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मेनका युवराज चव्हाण (वय ३२, रा. गडलक बेकरी समोर, साळवी स्टॉप, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या पतीसोबत घरी असताना उशिरा रात्री काही कारणावरून दोघांमध्ये संवाद सुरू असताना त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यानंतर महिलेने उंदीरनाशक विषारी औषध प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. तिची प्रकृती अचानक बिघडल्याने पती युवराज चव्हाण यांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले.
प्राथमिक उपचारांनंतर प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी तिला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आमृत्यू क्रमांक ४३/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.

