(विल्ये / अमित कांबळे )
भीमशक्ती जलसा कला निकेतन, लाजूळ यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित “गीत बहार सप्तसुरांचा पर्व-१” या जिल्हास्तरीय भव्य जलसा गीत गायन स्पर्धा रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी आनंदनगर, लाजूळ नरमे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १२ जलसा मंडळांनी सहभाग नोंदवला. रंगतदार सादरीकरणे, सुरेल गायन आणि प्रभावी वादन यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची रंगत वाढली.
स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील ‘निळी पाखरं’ कलामंचाने प्रथम क्रमांक पटकावत ७१०१ रुपये रोख, आकर्षक सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र मिळवले. ‘माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ’, तेर्ये (ता. संगमेश्वर) यांनी द्वितीय क्रमांक (५१०१ रुपये) मिळवला, तर ‘पंचशील जलसा मंडळ’, चाफेरी (ता. जि. रत्नागिरी) यांनी तृतीय क्रमांक (३१०१ रुपये) पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये ‘आम्रपाली कलामंच’, मालगुंड यांना प्रथम उत्तेजनार्थ (१००० रुपये) आणि ‘नवक्रांती जलसा मंडळ’, दोडवली (ता. गुहागर) यांना द्वितीय उत्तेजनार्थ (१००० रुपये) पुरस्कार देण्यात आला.
विशेष पारितोषिकांमध्ये ‘निळी पाखरं’ जलसा मंडळाने उत्कृष्ट सांघिक गायकीचा मान मिळवला. उत्कृष्ट ढोलकी वादक म्हणून ‘माता रमाई’ जलसा मंडळ तेर्ये, तर उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून ‘निळी पाखरं’ कलामंच यांना प्रत्येकी ५०० रुपये रोख आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण संतोष कासारे आणि सुधाकर सावंत (पाली) यांनी केले. त्यांनी सहभागी मंडळांना सादरीकरणातील बारकावे, तयारीतील आवश्यक बाबी यावर मार्गदर्शन करत स्पर्धेची गुणवत्ता अधिक उंचावली.
कार्यक्रमासाठी विजय रामचंद्र सावंत (गुरुवर्य) आणि कवी गौतम सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्य आयोजक व सूत्रधार म्हणून कवी-गायक सुधाकर शंकर सावंत यांनी जबाबदारी सांभाळली. याशिवाय रविकांत पवार, सतीश कदम, प्रदीप सावंत (अध्यक्ष, मिलिंद प्रतिष्ठान), तसेच इतर मान्यवरांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला प्रवीण पांचाळ, ऋतूजा जाधव, प्रितम सावंत, निशा सावंत, प्रकाश पवार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आणि निवेदक सुशिल जाधव यांनी करत रसिकांची मने जिंकली.
या स्पर्धेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जलसा परंपरेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त होत असून आयोजकांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

