(लांजा)
लांजा तालुक्यातील वाटुळ–दाभोळे मार्गावर पालू तिठा येथे आज (शुक्रवार, दि. १७ एप्रिल) रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. आयशर टेम्पो आणि समोरून येणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास वेगात असलेल्या ट्रक आणि आयशर टेम्पोमध्ये अचानक समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला. या भीषण अपघातात मुजाहिद गफूर मुजावर (वय २६, रा. राजापूर तालुका, रानतळे आंबेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या अपघातात टेम्पोमधील आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
या घटनेमुळे लांजा तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

