(रत्नागिरी)
शहराजवळील कुवारबाव परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदू संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर आणि पोमेंडी या परिसरातील नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कुवारबाव येथील श्री विठ्ठल मंदिर शेजारील महालक्ष्मी मंडळ पटांगण येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घराघरांत पत्रके वाटप, तसेच मंदिरांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी स्वयंसेवक आणि स्थानिक कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले आहेत.
या संमेलनात हिंदुत्व, सध्याच्या काळातील हिंदू समाजासमोरील आव्हाने तसेच ‘पंचपरिवर्तन’ या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. आयोजकांच्या मते, पाच ते सहा गावांमधील हजारो नागरिक या संमेलनात सहभागी होतील.
संमेलनाच्या प्रसिद्धीसाठी आज (शुक्रवार, दि. १७ एप्रिल) रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. ही फेरी कुवारबाव येथील श्री विठ्ठल मंदिरातून सुरू होऊन खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर आणि साईनगर या भागातून मार्गक्रमण करणार आहे.
या संमेलनात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

