(राजापूर / तुषार पाचलकर)
ग्रामविकासाच्या क्षेत्रात आदर्श ठरलेल्या हिवरे बाजारचे माजी सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचे “यशोगाथा ग्रामविकासाची” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्री क्षेत्र रायपाटण येथे आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानातून ग्रामविकासासाठी कार्य करणाऱ्या ग्रामस्थ, तरुणाई आणि सामाजिक कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायपाटण परिसरातील ग्रामीण विकासाला दिशा देणाऱ्या ग्रामविकास शिलेदारांचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार किरण सामंत तसेच माजी आमदार प्रमोद जठार हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरे बाजारच्या विकासामागे पोपटराव पवार यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले आहे. जलसंधारण, ग्रामशासनातील पारदर्शकता, लोकसहभाग आणि शाश्वत विकास या संकल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हिवरे बाजारचा विकास देशभरात आदर्श मानला जातो. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारकडून २०२० साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या व्याख्यानात पवार त्यांच्या ग्रामविकासाच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेत, विविध यशस्वी उपक्रमांची माहिती देणार असून लोकसहभागातून ग्रामीण विकास कसा साधता येतो, यावर मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामपंचायत पदाधिकारी, युवक, महिला बचतगट तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी ठरणार असून नव्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. समृद्ध कोकण, रत्नागिरी आणि जागृत सेवा मंडळ, रायपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समृद्ध कोकणचे अध्यक्ष संतोष गांगण यांनी दिली.

