(रत्नागिरी/ वार्ताहर)
रत्नागिरीच्या एसआरके तायक्वांदो अकॅडमीची खेाडू स्वरा साक्षी विकास साखळकर हिने राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
मुंबईतील विरार येथे २८ आणि २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या ‘व्हिक्टरी क्लब ६ वी महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६’ या स्पर्धेत स्वराने आपल्या कौशल्याची चमक दाखवली. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील अनेक नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्वराने कॅडेट गटातील ४४ किलोखालील वजनी गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर ज्युनियर गटातील ४४ किलो वजनी गटातही प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावावर केले. याशिवाय वैयक्तिक पुमसे प्रकारात कांस्यपदक जिंकत तिने एकूण तीन पदकांची कमाई केली.
नगरपरिषद शाळा क्रमांक १५ मध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या स्वराने राज्यस्तरावर केलेल्या या यशस्वी कामगिरीमुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेसाठी स्वराला राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, उपाध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक प्रशांत मकवाना आणि मिलिंद भागवत यांनी स्वराचे अभिनंदन केले.
तसेच एसआरके क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांनीही स्वराच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

